
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.) गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातील विविध भागांत जाणाऱ्या वाहनांची संख्या शनिवारी अचानक वाढल्याने वारजे परिसरात तब्बल सात तास वाहतूक कोंडी झाली. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत नवले पूल ते चांदणी चौक या दरम्यान पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानंतर अनेक वाहनचालकांनी सेवा रस्त्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या सेवा रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. परिणामी वारजे परिसरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच पुण्यातून नागरिकांनी खासगी वाहनांमधून गावाकडे जाण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. माई मंगेशकर रुग्णालयासमोरील उड्डाणपूल, वारजे येथील मुख्य उड्डाणपूल आणि त्यापुढील नवले पूल परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली.
महामार्गावरील कोंडी वाढत गेल्याने काही वाहनचालकांनी डुक्कर खिंड परिसरातून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावर वाहने वळवली. त्यामुळे सेवा रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या. खासगी वाहने, प्रवासी वाहने आणि मालवाहू वाहने मोठ्या संख्येने अडकून पडल्याचे चित्र होते.
वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा वेग मंदावला असून काही ठिकाणी दुचाकीस्वारांनाही वाहनांच्या मधून मार्ग काढणे कठीण झाले. गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गावरील वाहतुकीचा वाढलेला ताण यामुळे वारजे परिसरातील वाहतूक व्यवस्थेची मोठी कोंडी झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु