गणेशोत्सव दरम्यान बीएमसीद्वारे मस्जिद आणि माटुंगा येथील चार पादचारी पूल बंद
मुंबई, १३ सप्टेंबर (हिं.स.) : पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरील चार पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सूचना प्राप्त झाली आहे. ''इंडियन इन्स्टिट
गणेशोत्सव दरम्यान बीएमसीद्वारे मस्जिद आणि माटुंगा येथील चार पादचारी पूल बंद


मुंबई, १३ सप्टेंबर (हिं.स.) : पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरील चार पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सूचना प्राप्त झाली आहे. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', मुंबई यांनी केलेल्या संरचनात्मक तपासणीनंतर (स्ट्रक्चरल ऑडिट) हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी बीएमसी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पादचारी पुलांची संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यानंतर, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आयआयटी मुंबईने या चारही पुलांसाठी स्वतंत्र संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केले.

तपासणीमध्ये समाविष्ट असलेले चार पादचारी पूल खालीलप्रमाणे आहेत:

१. मस्जिद येथील भंडारी पादचारी पूल – किमी ०/५-६

२.मस्जिद स्थानक पादचारी पूल – किमी १/२-३

३. भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल – किमी १०/२२-२३

४. गुरु नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल – किमी ११/१४-१५

संरचनात्मक तपासणीच्या निष्कर्षांनुसार, हे चारही पूल संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. पुलांच्या महत्त्वाच्या संरचनात्मक भागांची झीज झाली असून त्यांना गंज लागला आहे. या तपासणी अहवालात हे पूल पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी त्वरित बंद करण्याची आणि त्यांची तोडून (dismantle) पुनर्बांधणी करण्याचा विचार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईच्या अहवालात नमूद केलेल्या संरचनात्मक सुरक्षिततेच्या चिंता आणि सार्वजनिक सुरक्षेला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन, बीएमसीने रेल्वे प्रशासनाला विनंती केली आहे की, हे चारही पूल पादचाऱ्यांच्या वापरासाठी त्वरित बंद करावेत आणि पुढील सूचना मिळेपर्यंत या पुलांवरून पादचाऱ्यांचे कोणतेही आवागमन होणार नाही याची खात्री करावी.

गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या संख्येत होणारी मोठी वाढ लक्षात घेता, हे पूल बंद करणे विशेष महत्त्वाचे आहे. उत्सवाच्या काळात रेल्वे स्थानके आणि आसपासच्या परिसरात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने, कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि प्रवासी व सामान्य जनतेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित ठरवलेल्या या पादचारी पुलांचा वापर प्रतिबंधित करणे आवश्यक आहे.

जनहितार्थ या पादचारी पुलांच्या बंद करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवासी आणि जनतेला केले आहे. गणपती उत्सवाच्या कालावधीत सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी प्रवाशांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande