
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. घराघरांत गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच सार्वजनिक गणेश मंडळांनीही उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. पुणेकरांच्या लाडक्या गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनही सज्ज झाले असून, गणेशमूर्ती विसर्जन, निर्माल्य संकलन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेवर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
गणेशोत्सवादरम्यान नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये, यासाठी नागरिकांनी नदी, ओढे, तलाव आदी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन हौदांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले आहे. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या गणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच निर्माल्य संकलन आणि स्वच्छतेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशमूर्ती आणि निर्माल्याचे योग्य पद्धतीने संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने म्हटले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु