
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या काळात मंडई परिसरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन महामेट्रो प्रशासनाने मंडई मेट्रो स्थानकात सुरक्षेच्या दृष्टीने एकदिशात्मक प्रवास व्यवस्था लागू केली आहे. गतवर्षी गणेशोत्सवादरम्यान एका दिवसात तब्बल ६५ हजार प्रवाशांनी मंडई स्थानकातून प्रवास केला होता. यंदा प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महामेट्रोने विशेष नियोजन केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मंडई स्थानकाबाहेर पडण्यासाठी असलेले दरवाजे गर्दीच्या तुलनेत अरुंद आहेत. विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी टिळक पुतळा चौकात होणारी गर्दी आणि मेट्रो प्रवाशांची संख्या एकाच वेळी वाढल्यास स्थानकातून बाहेर पडताना प्रवाशांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रवाशांच्या हालचालींवर एकदिशात्मक पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महामेट्रो प्रशासनाने ही विशेष प्रवास व्यवस्था केली असून, प्रवाशांनी नियोजनानुसार मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“मंडई स्थानकाबाहेर पडणारे दरवाजे गणेशोत्सवातील गर्दीच्या तुलनेत छोटे आहेत. अनंत चतुर्दशीच्या वेळी टिळक पुतळा चौकातील गर्दी आणि मेट्रो प्रवाशांची गर्दी एकत्र आल्यास स्थानकातून बाहेर पडणे कठीण होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मंडई स्थानकासाठी विशेष प्रवास नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रवाशांनी या नियोजनास सहकार्य करावे,” असे महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु