
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील विविध भागांतील विकासकामे प्रलंबित असून, वारंवार सूचना करूनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला होता. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सभासदांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विविध भागांतील रखडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त राम यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसराला भेट देऊन रखडलेली विकासकामे, मिसिंग लिंक, भूसंपादन तसेच स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला.
येरवडा परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करताना प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे या परिसरातील दीर्घकाळ रखडलेल्या कामांना आता गती मिळण्याची शक्यता आहे.
शहरातील विविध भागांमध्ये विकासकामे प्रलंबित असल्याबाबत नगरसेवकांकडून सातत्याने महापालिका प्रशासनावर टीका केली जात आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही रखडलेल्या कामांबाबत सभासदांनी प्रशासनाला जाब विचारला होता.
या पार्श्वभूमीवर आयुक्त राम यांनी विविध क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन स्थानिक पातळीवरील कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे केवळ बैठकीपुरती मर्यादित न राहता रखडलेल्या कामांवर प्रत्यक्ष कारवाई करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु