चंडक प्रकरणावरून सत्ताधारी गटातच विरोध; राजूबाई बीओटीचा प्रस्ताव फेरसादर करण्याची मागणी
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। राजूबाई मॅटर्निटी होम आणि राजूबाई ओपीडी दवाखान्याच्या जागेवरील बीओटी प्रकल्पासंदर्भातील प्रशासनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच विरोध दर्शविला आहे. मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या
smc


सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

राजूबाई मॅटर्निटी होम आणि राजूबाई ओपीडी दवाखान्याच्या जागेवरील बीओटी प्रकल्पासंदर्भातील प्रशासनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच विरोध दर्शविला आहे. मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेपूर्वी शनिवारी झालेल्या पक्ष बैठकीत या प्रस्तावावरून नगरसेवक आक्रमक झाले. प्रशासनाने प्रस्तावाचा फेरविचार करून तो फेरसादर करावा, अशी मागणी करण्यात आली.

शनिवार, १२ सप्टेंबर रोजी झालेल्या पक्ष बैठकीत स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक किसन जाधव, भारतसिंग बडूरवाले, विनायक विटकर, नगरसेविका वंदना गायकवाड आदींनी प्रस्तावातील विविध बाबींवर आक्षेप नोंदविले. जुन्या कराराची पार्श्वभूमी, प्रकल्प रखडण्याची कारणे, करारातील अटी तसेच महापालिकेच्या हिताचा विचार करून सध्याच्या स्वरूपातील प्रस्तावाला मंजुरी देण्यापूर्वी सखोल फेरविचार करण्याची भूमिका नगरसेवकांनी मांडली.

राजूबाई मॅटर्निटी होम आणि राजूबाई ओपीडी दवाखान्याच्या जागेवरील बीओटी प्रकल्पासाठी यापूर्वी करार करण्यात आला होता. मात्र, निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्यातच संबंधित कंपनी लिक्विडेशनमध्ये गेल्याने प्रकल्प रखडला.

आता उपलब्ध कायदेशीर अभिप्रायाच्या आधारे किशोर चंडक यांच्यासोबत नव्याने करार करून प्रकल्प पुढे नेण्याचा पर्याय प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. मात्र, जुन्या प्रकरणाची पार्श्वभूमी आणि महापालिकेचे हित लक्षात घेता नव्या कराराचा प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी सर्वंकष विचार व्हावा, अशी भूमिका पक्ष बैठकीत मांडण्यात आली.

त्यामुळे प्रशासनाचा प्रस्ताव सभागृहात येण्यापूर्वीच सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या विरोधामुळे राजूबाई बीओटी प्रकल्पाचा विषय अधिकच संवेदनशील बनला आहे. आता १५ सप्टेंबरच्या महासभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande