
पुणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, कलात्मक, क्रीडा आणि जीवनकौशल्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘समग्र प्रगतिपुस्तिका’ उपक्रमाच्या अंमलबजावणीची आता राज्यस्तरावरून तपासणी केली जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना किमान १५ शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन ‘समग्र प्रगती पुस्तिके’चा वापर कशा पद्धतीने केला जात आहे, याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पाहणीदरम्यान प्रगती पुस्तिकेची नोंद, तिचा नियमित वापर तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी तिचा प्रभावीपणे उपयोग केला जात आहे का, याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली आहे, हे स्पष्ट होणार आहे.
पाहणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हानिहाय संक्षिप्त अहवाल तयार करून २० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून आता शाळांमध्ये ‘समग्र प्रगती पुस्तिके’च्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु