सोलापूर - सांस्कृतिक महोत्सवाच्या पत्रिकेत महापौरांचे नाव गायब; भाजपमधील गटबाजीची पुन्हा चर्चा
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६’च्या निमंत्रण पत्रिकेवरून सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हण
सोलापूर - सांस्कृतिक महोत्सवाच्या पत्रिकेत महापौरांचे नाव गायब; भाजपमधील गटबाजीची पुन्हा चर्चा


सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६’च्या निमंत्रण पत्रिकेवरून सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांचे नाव या पत्रिकेत नसल्याने भाजपमधील अंतर्गत गटातटाचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या सहकार्याने रविवार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शुक्रवार पेठेतील मानाचा आजोबा गणपती मंदिर येथे हा महोत्सव होणार आहे. कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींची नावे आणि छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितींमध्ये आमदार ज्योती वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, विधान परिषद सदस्य राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे आणि जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार यांची नावे देण्यात आली आहेत. मात्र, सोलापूर शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर विनायक कोंड्याल यांचा पत्रिकेत साधा उल्लेखही नसल्याचे दिसून येत आहे.

शासकीय यंत्रणा आणि स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने होणाऱ्या कार्यक्रमात शहराच्या प्रथम नागरिकांना निमंत्रण अथवा स्थान न मिळणे हा निव्वळ योगायोग आहे की त्यामागे राजकीय गणित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापौरांचे नाव वगळण्यामागे नेमके कारण काय, हा निर्णय भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा परिणाम आहे की नियोजनातील अनवधानाने झालेली चूक, याबाबत आयोजकांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande