सोलापूर - २४ वर्षांची प्रतीक्षा संपली; पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल
सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। तब्बल २४ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने शनिवारी महत्त्वाचे पाऊल पडले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सोलापूर उपविभागांतर्गत सी.एस. क्र. २३२
sdfg


सोलापूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

तब्बल २४ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने शनिवारी महत्त्वाचे पाऊल पडले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सोलापूर उपविभागांतर्गत सी.एस. क्र. २३२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेत बांधण्यात आलेल्या २३८ सदनिकांची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये १२६ अत्यल्प उत्पन्न गटातील (EWS) आणि ११२ अल्प उत्पन्न गटातील (LIG) सदनिकांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, लोकसभा खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, म्हाडा पुणे मंडळाचे उपमुख्य अधिकारी राहुल शिळीमकर, प्रभारी कार्यकारी अभियंता मिलिंद अटकळे, मिळकत व्यवस्थापक रूपेश जयभाये, सोलापूर उपविभागाचे सूरज अजनाळकर, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार संघटनांनी गेली २४ वर्षे केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जागा निश्चित होऊन भूमिपूजन झाल्याचे सांगत, पत्रकारांना घर मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत गुढीपाडव्यापूर्वी पत्रकारांच्या हातात घराची चावी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सदनिकांची किंमत आणखी कमी करण्यासाठी शासन, सीएसआर तसेच इतर माध्यमांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पत्रकारांसाठीचा हा प्रकल्प देशातील पहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत, प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले. या निधीमुळे प्रत्येक सदनिकेची किंमत सुमारे २ ते २.५ लाख रुपयांनी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande