
छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर शहरात गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच राजकीय नेत्यांची गणेशदर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विविध पक्षांचे नेते शहरातील गणेश मंडळांना भेटी देत असून, याच पार्श्वभूमीवर आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय टोलेबाजीचा रंगही पाहायला मिळाला.
छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची आरती संपन्न झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यात राजकीय शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
यावेळी नंदकुमार घोडेले यांनी चंद्रकांत खैरे यांच्या समक्षच, “खैरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येणार,” असा थेट दावा केला. घोडेले यांच्या या वक्तव्यावर खैरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येतील, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे गणेशोत्सवाच्या धार्मिक वातावरणात काही क्षण राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि टोलेबाजी रंगली.
गणेशदर्शनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दोन्ही गटांतील नेत्यांमधील या शाब्दिक चकमकीची शहरात चांगलीच चर्चा रंगली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis