
छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी येत्या १५ सप्टेंबर रोजी मुंबईला आपण एकटाच जाणार असून, इतरांनी मुंबईकडे येऊ नये, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले.
यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला गावागावांत सज्ज राहण्याचे आवाहन केले. देवदेवतांच्या आडून वार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वाराच्या काळात दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काहीजण करीत असल्याचेही त्यांनी म्हटले.
“मराठ्यांनो, तुम्हाला योग्य वेळी मुंबईला बोलावीन. सध्या मी एकटाच जाणार आहे. बाकीच्यांनी आपल्या गावामध्ये सज्ज राहावे,” असे जरांगे यांनी सांगितले.
मुंबईकडे जाताना आपल्याला अडविण्याचा प्रयत्न झाला तरी आपण मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मी चाललो आहे. मला अडवण्याचा कोणात दम आहे, ते बघतो,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगे म्हणाले की, “आता मी एकटा येतोय. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मी नवा डाव टाकला आहे. आता मला परवानगी कोण टाळतो, ते बघतो,” असे आव्हान त्यांनी दिलेय.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis