अमरावतीत गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा उपक्रम
अमरावती, 14 सप्टेंबर (हिं.स.)। घरोघरी मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना व्हावी तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश पोहोचावा, या उद्देशानं मूर्तिकार निलेश कंचनपुरे यांनी मातीची गणेश मूर्ती खरेदी करणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक कुंडी आ
अमरावतीत गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा उपक्रम


अमरावती, 14 सप्टेंबर (हिं.स.)।

घरोघरी मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना व्हावी तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश पोहोचावा, या उद्देशानं मूर्तिकार निलेश कंचनपुरे यांनी मातीची गणेश मूर्ती खरेदी करणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक कुंडी आणि एक रोप मोफत देण्याचा उपक्रम सुरू केलाय.

नेहरू मैदान येथे निलेश कांचनपुरे यांच्या स्टॉलवर मातीच्या आकर्षक गणेश मूर्तीसोबत भाविकांना शमी, बेल, कांचन, चिंच आदी वृक्षांची रूप आणि एक कुंडी देण्यात येत आहेत. गणेश मूर्ती घरी नेण्यासोबतच एक रोपही घरी नेऊन त्याचं संगोपन करण्याची संधी भाविकांना मिळत आहे. त्यामुळं गणेशोत्सवाचा आनंद पर्यावरण संवर्धनाशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातोय.

अमरावती शहरातील नेहरू मैदान परिसरात मातीच्या गणेश मूर्तीचा स्टॉल लावण्यात आला आहे. घरगुती गणपतीसाठी विविध आकार आणि आकर्षक स्वरूपातील मूर्ती येथे उपलब्ध आहेत. या मूर्तींची किंमत साडेसातशे रुपयांपासून साडेचार हजार रुपयांपर्यंत आहे. लहान मूर्तींसाठी साधारण पाच किलो तर मोठ्या मूर्तींसाठी 20 ते 25 किलो माती लागते अशी माहिती निलेश कंचनपुरे यांनी दिली.पीओपीच्या तुलनेत मातीच्या गणेश मूर्तींची किंमत काहीशी जास्त असली तरी पर्यावरण संवर्धनाबाबत अमरावतीकरांमध्ये वाढलेली जागरूकता या मूर्तीच्या मागणीतून दिसून येत आहे. अनेक भाविक गेल्या काही वर्षांपासून मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना करत असून यंदाही पर्यावरणपूरक मूर्ती घेण्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मातीची मूर्ती जलस्त्रोतांमध्ये विसर्जित करण्याऐवजी घरच्या घरी विसर्जन करण्याचा संदेशही निलेश कांचनपुरे देत आहेत. घरातील एखाद्या टप किंवा मोठ्या पात्रात पाणी घेऊन मूर्तीच विसर्जन करावं. त्यानंतर तयार झालेली माती मोफत दिलेल्या कुंडीत टाकून त्यात दिलेलं रोप लावावं. अशी संकल्पना त्यांनी मांडली. गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित झाल्यानंतर तिची माती पुन्हा एका झाडाच्या रूपात जिवंत व्हावी. गणेशोत्सवाच्या माध्यमातून निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश घरोघरी पोहोचावा हाच या उपक्रमाचा उद्देश आहे असं मूर्तिकार निलेश कांचनपुरे यांनी सांगितलं.माती नैसर्गिक असली तरी गणेश मूर्तीवरील रंग आणि अन्य सजावटीच्या साहित्यामध्ये रासायनिक घटक असण्याची शक्यता असते. त्यामुळं मातीच्या मूर्तीही थेट विहिर, नदी, तलाव किंवा अन्य जलस्रोतांमध्ये विसर्जित न करता शक्यतो घरच्या घरी विसर्जन करणं अधिक योग्य ठरतं असं निलेश कंचनपुरे यांनी सांगितलं. घरच्या घरी विसर्जन करून मिळालेल्या मातीचा उपयोग झाड लावण्यासाठी केल्यास गणेशोत्सवाचा पर्यावरणपूरक संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरू शकतो असं देखील निलेश कांचनपुरे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande