दिशा सालियन मृत्यूप्रकरणी 6 वर्षांनी गुन्हा दाखल; सामूहिक अत्याचार, हत्येसह कटाचे कलम
मुंबई, १४ सप्टेंबर (हिं.स.) : बहुचर्चित दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला तब्बल सहा वर्षांनंतर नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हत्या, सामूहिक अत्याचार, कट रचणे आणि पुरा
Case Registered Six Years After Disha Salian Death


मुंबई, १४ सप्टेंबर (हिं.स.) : बहुचर्चित दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला तब्बल सहा वर्षांनंतर नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हत्या, सामूहिक अत्याचार, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्यासह गंभीर आरोपांच्या अनुषंगाने तपासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या मृत्यूमागील नेमके गूढ काय, याचा उलगडा होण्याच्या आशा पुन्हा निर्माण झाल्या आहेत.

दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवला होता. तसेच, या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या जबाबाच्या आधारे सीबीआयने एफआयआर दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या एफआयआरमध्ये नेमके कोणाला आरोपी करण्यात आले आहे, याबाबतची माहिती अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही.

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात भारतीय दंड विधानातील कलम ३०२ अंतर्गत हत्या, कलम ३७६ अंतर्गत सामूहिक अत्याचार, कलम १२०(ब) अंतर्गत कट रचणे, कलम २०१ अंतर्गत पुरावे नष्ट करणे तसेच कलम २१७ आणि २१८ अंतर्गत तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता अत्यंत संवेदनशील आणि गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे.

दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

दिशाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, तिच्या पालकांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत तिच्या मृत्यूमागे कटकारस्थान असल्याचा दावा केला होता.

तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर आता सहा वर्षांनी सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाच्या तपासाला अधिकृतपणे नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी तिचे शवविच्छेदन करण्यात आले होते. अहवालात तिच्या हाताला, पायाला आणि छातीवर जखमा झाल्याचे नमूद करण्यात आले असून, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे नमूद आहे. नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचाही उल्लेख अहवालात आहे. मात्र, उपलब्ध शवविच्छेदन अहवालानुसार लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याचे आढळले नसल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.

आता सीबीआयने हत्या आणि सामूहिक अत्याचारासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केल्याने तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.

दिशाच्या मृत्यूच्या रात्री नेमके काय घडले? तिच्या मृत्यूमागे खरोखर कट होता का? या प्रकरणात नेमके आरोपी कोण आहेत? आणि पुरावे दडपण्याचा प्रयत्न झाला का? या प्रश्नांची उत्तरे सीबीआयच्या तपासातून समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

सहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिशा सालियनच्या कुटुंबीयांसाठी सीबीआयचा हा गुन्हा दाखल होणे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आता तपासातून सत्य बाहेर येते का आणि या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई होते का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande