
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)। महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानमधून आयातीवरील बंदीला बगल देण्याचा प्रयत्न उघडकीस आणत पाकिस्तानमूळाचे ३६२ मेट्रिक टनांहून अधिक खारीक (ड्राय डेट्स) जप्त केले आहेत. डीआरआयच्या विशेष मोहिमेअंतर्गत ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
अर्थ मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या अंबड येथील कंटेनर फ्रेट स्टेशनवर मुंबईतील एका कंपनीने आयात केलेल्या खारकांनी भरलेले १३ कंटेनर रोखले. आयातीशी संबंधित कागदपत्रांमध्ये मालाचा मूळ देश संयुक्त अरब अमिराती (यूएई) असा नमूद करण्यात आला होता.
प्राथमिक तपासात मालाचा खरा स्रोत लपवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने ट्रान्स-शिपमेंटचा वापर करण्यात आल्याचे समोर आले. तपासानुसार, हे खारीक प्रथम पाकिस्तानमधील कराची बंदरातून यूएईमधील जेबेल अली बंदरात पाठवण्यात आले. त्यानंतर तेथून माल केवळ दुसऱ्या कंटेनरमध्ये स्थानांतरित करून भारतात पाठवण्यात आला. तपासात या संपूर्ण प्रक्रियेत पाकिस्तानी नागरिकांकडून चालवल्या जाणाऱ्या काही संस्थांची भूमिका असल्याचेही समोर आले आहे. डीआरआयने कागदपत्रे आणि मालाचे वास्तविक मूळ यामधील तफावत गांभीर्याने घेत ही खेप जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून भारत सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमधून येणाऱ्या किंवा पाकिस्तानी मूळाच्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर तसेच पारगमनावर पूर्णपणे बंदी घातली होती. मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी मूळाचा माल तिसऱ्या देशांमार्फत भारतात आणून निर्बंधांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवले जात आहे. याच अनुषंगाने डीआरआय ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’अंतर्गत अशा मालाची ओळख पटवणे, त्याला रोखणे आणि जप्त करण्याची कारवाई करत आहे.
डीआरआयच्या म्हणण्यानुसार, चुकीची घोषणा, ट्रान्स-शिपमेंट आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून व्यापार निर्बंधांना बगल देण्याच्या प्रयत्नांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे. नाशिकमध्ये करण्यात आलेली ही कारवाई प्रतिबंधित वस्तूंची अप्रत्यक्ष आयात रोखण्यासाठी आणि सीमाशुल्क कायद्यांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे डीआरआयने म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule