
भारतात आयातीवर बंदी, मध्यस्थी देशातून व्यापाराचा प्रयत्न
नाशिक, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
- आयात बंदी असूनही दुसऱ्या देशामार्फत भारतात माल पाठवल्याच्या घटनेसंदर्भात टाकलेल्या छाप्यानंतर महसूल गुप्तचर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने सुरक्षेच्या कारणास्तव २ मे २०२५ पासून पाकिस्तानमध्ये उत्पादित किंवा पाकिस्तानमधून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर संपूर्ण बंदी घातली आहे. असे असूनही, तिसऱ्या देशामार्फत पाकिस्तानमधून भारतात माल आयात करण्याच्या प्रयत्नांचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
केंद्र सरकारने पाकिस्तानमधून भारतात मालाच्या आयातीवर बंदी घातली आहे. तथापि, ही बंदी टाळण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) हाणून पाडला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 'ऑपरेशन दीप मॅनिफेस्ट' अंतर्गत नाशिकमध्ये एक मोठी मोहीम राबवली आहे.
डीआरआयने नाशिकमध्ये पाकिस्तानमधून आयात केलेले ३६२ मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त केले आहेत. एका गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या अंबड येथील कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) येथे मुंबईस्थित कंपनीने आयात केलेले सुक्या खजुराचे १३ कंटेनर जप्त केले. कंटेनरच्या तपासणीत हा माल पाकिस्तानमधून आयात करण्यात आल्याचे उघड झाले.
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या कंटेनरमधील माल संयुक्त अरब अमिरातीमधील जेबेल अली बंदरातून भारतात आयात करण्यात आला होता. मात्र, आयातीच्या कागदपत्रांमध्ये मालाच्या उगमाबद्दल खोटी माहिती होती.
प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, हा माल पाकिस्तानमध्ये तयार झाला होता ही वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हे सुके खजूर सुरुवातीला पाकिस्तानमधील कराची बंदरातून एका कंटेनरमधून संयुक्त अरब अमिरातीमधील जेबेल अली बंदरात पाठवण्यात आले होते. नंतर, कागदपत्रांमध्ये फेरफार करून माल दुसऱ्या कंटेनरमध्ये भरण्यात आला. बनावट कागदपत्रांचा वापर करून आयात नियमांचे उल्लंघन करण्यात आले.
पाकिस्तानी नागरिकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कंपन्यांमार्फत हे खजूर भारतात पाठवण्यात आले असावेत, असा तपास यंत्रणांना संशय आहे. दरम्यान, या कारवाईमुळे एका अशा रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे, जे पाकिस्तानमधून येणाऱ्या मालाचे मूळ लपवून तो इतर देशांमधून आल्याचे भासवत होते. सीमाशुल्क विभाग आणि गुप्तचर यंत्रणा या रॅकेटमधील इतर दुव्यांचा तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI