कर्नाटक : बेळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
बेळगाव, 15 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या आनंदात कर्नाटकातील बेळगाव शहरात सोमवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. मार्केट पोलीस ठाणे हद्दीतील चाव्हाट गल्ली येथे एका घराला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जिवंत होरपळून मृत्य
KR Belagavi Massive fire Four family members burnt


बेळगाव, 15 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या आनंदात कर्नाटकातील बेळगाव शहरात सोमवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. मार्केट पोलीस ठाणे हद्दीतील चाव्हाट गल्ली येथे एका घराला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीररीत्या भाजल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपले होते. त्याचवेळी विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले. आग इतकी भीषण होती की, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आणि घरात असलेल्या व्यक्तींना वेळेत बाहेर पडता आले नाही.

या दुर्घटनेत गजानन राजाराम दमोने (६५), शारदा दमोने (४५), भारती राजाराम दमोने (५०) आणि रोशन गजानन दमोने (२१) यांचा मृत्यू झाला. तर प्रिया गजानन दमोने (२८) आणि गंगा गजानन दमोने (२५) या दोघी गंभीररीत्या भाजल्या आहेत. दोघींनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, दमोने कुटुंब दैनंदिन मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. गणेशोत्सवाच्या काळात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande