दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेत गंभीर त्रुटी
-इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता 3 प्रवासी रवान झाले - एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली नवी दिल्ली, 15 सप्टेंबर (हिं.स.) । दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेशी संबंधित गंभीर त्रुटी समोर आली आहे. अमृतसरहून दिल्लीला आलेले 3 इटालियन प्रवा
एअर इंडिया लोगो


-इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता 3 प्रवासी रवान झाले

- एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर (हिं.स.) । दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेशी संबंधित गंभीर त्रुटी समोर आली आहे. अमृतसरहून दिल्लीला आलेले 3 इटालियन प्रवासी निर्धारित इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय विमानापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

गेल्या 4 सप्टेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानाने अमृतसरहून दिल्लीला पोहोचलेल्या 3 इटालियन प्रवाशांना दिल्लीहून लुफ्थांसाच्या विमानाने म्युनिकला जायचे होते. नियमानुसार दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांना अरायव्हल इमिग्रेशन क्षेत्रात जाऊन आवश्यक इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना इमिग्रेशन क्षेत्रात न नेता थेट आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर क्षेत्राकडे नेण्यात आले आणि तेथून त्यांनी लुफ्थांसाच्या विमानात प्रवेश केला.या प्रकाराची दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेवोल्डे गेब्रेमारियम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एअर इंडियाकडून 9 मुद्द्यांवर लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. संबंधित विमान कंपनीने 19 सप्टेंबरपर्यंत आपल्याविरुद्ध कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे.

नोटिशीत प्रवाशांना हाताळणाऱ्या आणि त्यांना एस्कॉर्ट करणाऱ्या एअर इंडिया तसेच SATSच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तीनही प्रवाशांना आंतरराष्ट्रीय-ते-आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर मार्गाने का नेण्यात आले, हा या प्रकरणातील प्रमुख प्रश्न आहे. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी अरायव्हल इमिग्रेशन क्षेत्रातून जाऊन निर्धारित प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते.याशिवाय, अमृतसर विमानतळावरच लुफ्थांसाच्या दिल्ली-म्युनिक विमानासाठी पुढील प्रवासाचा बोर्डिंग पास का जारी करण्यात आला, यावरही मंत्रालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. नोटिशीनुसार, हब-अँड-स्पोक मॉडेलनुसार स्पोक विमानतळावर अशा प्रकारे पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासाचा बोर्डिंग पास जारी करण्याची परवानगी नसते.मंत्रालयाने एअर इंडियाच्या नोडल अधिकाऱ्याच्या भूमिकेसह संपूर्ण पर्यवेक्षण यंत्रणेकडूनही स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकरणावर एअर इंडियाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हब-अँड-स्पोक मॉडेलचा मुद्दा

एअर इंडिया काही मार्गांवर हब-अँड-स्पोक मॉडेलनुसार काम करते. या व्यवस्थेत परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना स्पोक विमानतळावरच इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यानंतर हब विमानतळावर पोहोचल्यानंतर मुख्यतः सुरक्षा तपासणी पूर्ण करून ते आंतरराष्ट्रीय विमान पकडू शकतात.

मात्र, अमृतसर-दिल्ली आणि दिल्ली-म्युनिक हे दोन्ही प्रवास या व्यवस्थेअंतर्गत येत नसल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे या तीन प्रवाशांना दिल्ली विमानतळावर अरायव्हल इमिग्रेशनची निर्धारित प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य होते.

गृह मंत्रालयाचीही बैठक

या घटनेची गंभीर दखल गृह मंत्रालयानेही घेतली असून, संबंधित अधिकारी आणि विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मंगळवारी होणाऱ्या या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन भूषवणार आहेत.या बैठकीला एअर इंडियाचे ग्रुप हेड (गव्हर्नन्स, रेग्युलेटरी, कम्प्लायन्स अँड कॉर्पोरेट अफेयर्स) पी. बालाजी, तसेच गुप्तचर विभाग (आयबी) आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, ब्युरो ऑफ इमिग्रेशनचे आयुक्त आणि दिल्ली विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याही उपस्थितीची अपेक्षा आहे.

हब-अँड-स्पोक नियमांच्या कथित उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांवर सादरीकरण करण्याचे निर्देशही गृह मंत्रालयाने संबंधित मंत्रालयाला दिले आहेत. या घटनेमुळे दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन, प्रवासी व्यवस्थापन आणि सुरक्षा देखरेख यंत्रणेतील समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande