प्रकृतीच्या त्रासामुळे जरांगेंचा पुढील दौरा रद्द होण्याची शक्यता
पाटोद्यात जरांगेंच्या स्वागताला मध्यरात्री हजारोंची उपस्थिती बीड, १६ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे यांचा पहिला रात्रीचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे झाला. नियोजित वेळेपेक्षा बराच उशीर
Q


पाटोद्यात जरांगेंच्या स्वागताला मध्यरात्री हजारोंची उपस्थिती

बीड, १६ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे यांचा पहिला रात्रीचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे झाला. नियोजित वेळेपेक्षा बराच उशीर झाल्यानंतर जरांगे पाटील बुधवारी पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पाटोद्यात दाखल झाले. एवढ्या उशिराची वेळ असूनही त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाजबांधव आणि महिलांची मोठी गर्दी जमली होती.

यावेळी जरांगे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आपल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. उपोषणामुळे त्रास होत असल्याने सध्याच्या परिस्थितीत पुढील दौरा करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.“उपोषणात दौरा चांगला नाही. त्रास होत असल्याने आरक्षण महत्त्वाचे आहे, दौरा महत्त्वाचा नाही. खोपोलीपर्यंत जायचे असेल तर माणूस जेवण करून असला पाहिजे. मला पुढचा दौरा आता शक्य होत नाही,” असे जरांगे म्हणाले. पाटोद्यातून पोलिसांना माहिती देऊन मुंबईच्या दिशेने पुढे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नियोजित दौऱ्यात बदल होणार का आणि ते पुढील प्रवास कशा पद्धतीने करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार पाटोद्यानंतर श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथे मुक्काम करून १९ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानात पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीविषयक वक्तव्यामुळे या नियोजनात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याचदरम्यान, मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था, वाहतूक आणि सार्वजनिक सुविधांवरील ताण यांचा संदर्भ देत परवानगी नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे जरांगे यांच्या प्रकृतीचा प्रश्न, तर दुसरीकडे मुंबईतील आंदोलनाला परवानगीचा मुद्दा, यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande