
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। भारतरत्न इंदिरा नगर येथील श्री शरणशिवलिंगेश्वर साधु महाराजांचे अड्डपल्लकी म्हणजे पालखी महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. दरवर्षी श्रावण समाप्ती निमित्त या पालखीचे आयोजन करण्यात येते. या पालखी महोत्सवापूर्वी श्रावण महिन्यात रोज पहाटे 5.30 ते 6 या वेळेत जप आणि त्यांनतर श्रींची पादपूजा असा नित्यक्रम असतो याची सांगता पालखी महोत्सवाने होते.
श्रींच्या पालखी महोत्सव दिवशी जप, महाभिषेक, पालखी मार्गावर प्रभातफेरी, आणि पादपूजा आदी धार्मिक विधी झाल्यानंतर पालखी मिरवणुकीस सुरूवात झाली. या मिरवणूकीत कर्नाटकातील आळंद तालुक्यातील हिरोळी येथील सोमेश्वर भजन मंडळ, बनशंकरी देवस्थान भजन मंडळ, मादन हिप्परगा येथील श्रीशरणशिवलिंगेश्वर भजन मंडळ, अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील चिट्टहलगी व सनई वादक संघ, ढोल पथक अशा पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. ही मिरवणूक भारत रत्न इंदिरा नगर परिसरातून काढण्यात आली आणि सायंकाळी 5.30 वाजता ओम नमः शिवाय मंत्रोच्चाराने या पालखी महोत्सवाची सांगता झाली. यावेळी शरण भक्तांकडून शिवनामाचा गजर आणि इतरही जयघोष करण्यात आला
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड