रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश; स्नो स्प्रे व केमिकल स्प्रेच्या वापरालाही मनाई
अलिबाग, १६ सप्टेंबर (हिं.स.) : गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, तसेच नागरिकांच्या आरोग्यासह बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यात डॉल्बी/डीजे स
Ban on Dolby sound systems, laser beams, and snow sprays during the Ganesh immersion procession.


अलिबाग, १६ सप्टेंबर (हिं.स.) : गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात, तसेच नागरिकांच्या आरोग्यासह बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यात डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईट, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये याबाबत प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी १९ सप्टेंबर २०२६ आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकांना लागू राहणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील डॉल्बी व डीजे, तीव्र क्षमतेचे लेझर बीम तसेच विविध प्रकारच्या स्प्रेचा वापर केला जातो. या साधनांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

ध्वनीक्षेपकांच्या अतितीव्र आवाजामुळे नागरिकांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होण्यासोबतच काही व्यक्तींना आरोग्यविषयक त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच, तीव्र क्षमतेच्या लेझर बीममुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये अशा साधनांचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित साधनांचा वापर करणारी व्यक्ती, संस्था, गणेशोत्सव मंडळ किंवा संबंधित संचालक यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande