भिवंडी येथे विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; माजी आमदारासह दोघांवर गुन्हा नोंद
- आरोप खोटे असल्याचा दावा मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - पतीसोबतच्या वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय विवाहितेला बापगाव येथील फार्महाऊसवर नेऊन सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र
भिवंडी येथे विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; माजी आमदारासह दोघांवर गुन्हा नोंद


- आरोप खोटे असल्याचा दावा

मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - पतीसोबतच्या वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय विवाहितेला बापगाव येथील फार्महाऊसवर नेऊन सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर यादिवशी पतीसोबतचा वाद मिटविण्यासाठी पवार यांनी महिलेला कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर तिला बापगाव येथील शेतघरात (फार्महाऊस) नेण्यात आले. तेथे शस्त्राचा धाक दाखवून मद्य पाजल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. घटनेनंतर १६ सप्टेंबरला तिने काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे सहाय्य मागितले. त्यानंतर त्या महिलेला घेऊन पडघा पोलीस ठाणे येथे गेल्या. पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील अन्वेषण चालू केले आहे.

माझ्यावरील आरोप खोटे, निराधार; निष्पक्ष अन्वेषणातून सत्य समोर येईल - माजी आमदार नरेंद्र पवार

आपल्याविरोधात नोंद झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोप पूर्णपणे खोटे व निराधार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामागे सामाजिक आणि राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी निष्पक्ष अन सखोल अन्वेषणाची मागणी केली आहे. संबंधित प्रकरणातील सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावत अन्वेषण यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पक्षाची प्रतिमा आणि संघटनेची प्रतिष्ठा प्रभावित होऊ नये, या नैतिक भूमिकेतून पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी घोषित केले. हा निर्णय कोणत्याही दबावाखाली नसून, राजीनामा म्हणजे आरोप मान्य केल्याचा अर्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अन्वेष चालू असल्याने अधिक भाष्य टाळणार असून, योग्य वेळी त्यांची भूमिका कायदेशीर प्रक्रियेद्वारे मांडणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande