दहा हजारांच्या सुपारीत ५५ झाडांचा बळी; जाहिरातींसाठी वृक्षतोड
गंगापूर रोडवरील वृक्षतोडीप्रकरणी दोघांवर संशय; एका संशयिताला अटक, नाशिक, १७ सप्टेंबर (हिं.स.) : गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगरदरम्यान दुभाजकात लावण्यात आलेली तब्बल ५५ झाडे रातोरात तोडल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल
दहा हजारांच्या सुपारीत ५५ झाडांचा बळी; जाहिरातींसाठी वृक्षतोड


गंगापूर रोडवरील वृक्षतोडीप्रकरणी दोघांवर संशय; एका संशयिताला अटक,

नाशिक, १७ सप्टेंबर (हिं.स.) : गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगरदरम्यान दुभाजकात लावण्यात आलेली तब्बल ५५ झाडे रातोरात तोडल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. रस्त्यावरील स्ट्रीट लाईटवर जाहिरातींचे दुहेरी फलक लावण्यासाठी वाहनधारकांचा दृष्टीक्षेप अडथळा ठरणारी ही झाडे अवघ्या १० हजार रुपयांच्या मोबदल्यात तोडण्यात आल्याचा तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे.

जाहिरातींसाठी झाडे तोडल्याचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, महानगरपालिकेसह अन्य खासगी संस्थांची जाहिरात करणाऱ्या नम्रता ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा चालक मच्छिंद्र देशमुख याने जाहिरातींच्या आड येणारी झाडे हटविण्यासाठी अभिमन्यू खैरनार (वय ४५, मूळ रा. मालेगाव) याला १० हजार रुपये दिल्याचा आरोप आहे.

या मोबदल्यातूनच ३० ऑगस्ट रोजी पहाटे दोन ते पावणेतीनच्या सुमारास वृक्षतोड करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी श्रीकांत इरणक यांनी फिर्याद दिली आहे.

गंगापूर पोलिसांनी अभिमन्यू खैरनार याला अटक केली असून, जाहिरात एजन्सीचा चालक मच्छिंद्र देशमुख याला या प्रकरणात सहसंशयित करण्यात आले आहे. वृक्षतोडीत सहभागी मजुरांनाही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे अधिक तपास करीत आहेत.

विविध कलमांन्वये गुन्हा

या प्रकरणात अभिमन्यू खैरनार याच्यासह अन्य तीन साथीदार संशयित आहेत. त्यांच्याविरुद्ध बीएनएसच्या संबंधित कलमांसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन कायदा, २०२१ मधील कलम २१(१), पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ मधील कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

---------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande