धारणीत लाचखोर साहाय्यक अभियंत्याला अटक
अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी येथे एक खळबजनक प्रकार समोर आला असून, दीड कोटी रुपयांच्या बिलाच्या मोबदल्यात एकूण १० लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या साहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाख रुपयां
अटक लोगो


अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी येथे एक खळबजनक प्रकार समोर आला असून, दीड कोटी रुपयांच्या बिलाच्या मोबदल्यात एकूण १० लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या साहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. विनोद मकरध्वज नवघरे (वय ३४, रा. विसावा कॉलनी, अमरावती, मूळ रा. बोरखेडी, पो. वेणी, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे या जाळ्यात अडकलेल्या लाचखोर साहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर व बिल्डिंग मटेरियल सप्लायर असून त्यांनी २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणीअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून धारणी तालुक्यातील विविध गावांमध्ये सिमेंट काँक्रिट रस्ता साहित्याचा पुरवठा व बांधकामाची कामे केली होती. या कामांपैकी दीड कोटी रुपयांचे काम मार्च २०२६ मध्ये प्राप्त झाले होते, तर उर्वरित ८० लाख रुपयांचे देयक मिळणे बाकी होते. मार्च २०२६ मध्ये काढलेल्या दीड कोटी रुपयांच्या देयकाच्या मोबदल्यात साहाय्यक अभियंता विनोद नवघरे याने ७ टक्के प्रमाणे १० लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, आरोपीने तडजोडीअंती ९ लाख रुपये लाच घेण्याचे मान्य केले व त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास सापळा कारवाई करत आरोपीने तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी १७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास धारणी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या यशस्वी कारवाईत पोलीस उपअधीक्षक रमेश ताले, पोलीस हवा. प्रमोद रायपुरे, ना.पो.कॉ. वैभव जायले व चालक पो.कॉ. राजेश बहीरत यांनी सहभाग घेतला. नागरिकांना लाच मागणाऱ्या लोकसेवकांविषयी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande