सरकारच्या आश्वासनानंतर जरांगेंचे उपोषण तूर्तास स्थगित, आंदोलन सुरुच राहणार
- तर मुंबई गाठण्याचा दिला इशारा मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज अखेर (17 सप्टेंबर) उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगेंनी 90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर
जरांगे उपोषण स्थगित


- तर मुंबई गाठण्याचा दिला इशारा

मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज अखेर (17 सप्टेंबर) उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगेंनी 90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच उपोषण स्थगित केलंय, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं स्पष्ट केलं. दरम्यान जीआर काढून गॅझेटियरची अंमलबजावणी करावी. 58 लाख नोंदींमधील एकही नोंद कमी व्हायला नको...नोंदी कमी करणार नाही, याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार, असा इशाराही दिला आहे. तसेच मुंबईत गेलेल्या लाखो समर्थकांनी माघारी यावं, असं आवाहन देखील जरांगेंनी केलं आहे. बीडच्या पाटोद्यात सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर जरांगेंनी सरकारवर तीन महिने विश्वास ठेवण्याची तयारी दाखवली.

आज, गुरुवारी सकाळी 5 वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीसाठी बीडमधील पाटोदा येथे दाखल झालं होतं. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस यांचा समावेश होता. जवळपास 1.30 तास मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळ यांच्यात चर्चा झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा समाजाला खुन्नस देणं चांगलं नाही. चर्चा न करणारे आज चर्चेसाठी आले की नाही?, आरक्षणापेक्षा समाजाची इज्जत महत्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे वैरी नाहीत. पण समोरुन वार आलं, तर काय करणार?, असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला. तसेच राधाकृष्ण विखे चुकत असले तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेंवरही प्रेम करु पण आता नाही. मंत्र्यांनी टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही, असंही स्पष्ट केलं.

दुसरीकडे जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे तसंच या विषयावरची चर्चा पुढे सरकावी, यासाठी थेट पॅरिसमधून सूत्रं हलल्याची माहिती आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पॅरीसमधून जवळपास साडे तीन तासाच्या अथक शिष्टाईनंतर तोडगा काढण्यात यश मिळवलं. मंत्री सामंत हे अंतराळ क्षेत्रातील गुंतवणूक व संशोधन विषयावरील एका परिषदेत सहभागी होण्यासाठी पॅरिस येथे गेले होते, दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने सामंत यांनी मनोज जरांगे यांच्याशी संवाद जारी ठेवला. काल दिवसभरात सामंत किमान 7 वेळा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड व उदय सामंत यांच्यात कॉन्फरन्स कॉल वर चर्चा झाली. या चर्चेनंतर जरांगेंच्या निकटवर्तीयांशी उदय सामंत यांची चर्चा झाली. त्यानुसार गणेशोत्सव पाहता जरांगेंनी आंदोलन स्थगित करावे व त्यांच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर शिष्टमंडळ बीडसाठी निघाले.

हैदराबाद गॅझेट संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलीडिटी द्यावी लागणार, हैद्राबाद गॅझेट जीआर सुधारीत करून द्या. तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढू नका. तुमच्या-आमच्या झालेल्या चुका सोडून द्या. हिंदू वाणी, हिंदू वैश्य आणि वैश्य वाणी या तिन्हीही जाती एकच असल्याचा जीआर अलीकडे राज्य सरकारने काढला आहे. तसा जीआर मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा. या समाजाला एक न्याय आणि आम्हाला एक न्याय का? स्वातंत्र्यपूर्व काळात मराठा हा कुणबी होता. नजरचुकीने तो आरक्षणात घ्यायचा राहिला, असा उल्लेख वरील जातीचा जीआर काढताना केला, तसा आमच्या जीआरमध्ये टाका, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

त्यावर सरकारने पुढील हमी दिली आहे. यामध्ये सातारा, कोल्हापूर, पुणे, औंधचं गॅझेट तीन महिन्यांत जीआर काढून लागू करु, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी सुधारीत जीआर काढू, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांना वैधता देणं चालूच राहील, शिंदे समितीस मिळालेल्या 58 लाख नोंदी घटवणार नाही, मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींची रद्द केलेली कुणबी प्रमाणपत्रे वैध करु.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande