
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे वैरी नाहीत. पण समोरुन वार आलं, तर काय करणार?, चांगल्या अधिकाऱ्यांना कुणबी रेकॉर्ड शोधण्याचे काम द्या. तुम्हाला वेळ मारून न्यायचा असेल तर आमचं आंदोलन चालूच राहू द्या, असं मनोज जरांगेंनी सांगितले. मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधीचे रद्द करण्यात आलेले 4 कुणबी प्रमाणपत्र वैध करून द्या, अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी केली. मी पाच मुद्दे सांगितले, यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट बोलावं. पत्रकार परिषद घेऊन बोला नाहीतर व्हिडीओ काढून बोला, असं मनोज जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर येऊन याबाबत आश्वासन द्यायला हवे
न्या. संदीप शिंदे समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदी कमी होणार नाही हे तुम्हाला लेखी द्यावे लागणार...एकही नोंद कमी होता कामा नये या नोंदी वाटप करणे आणि त्याची व्हॅलीडिटी द्यावी लागणार, याचा मला टाईमबॉण्ड द्या, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची सही असायला हवी. तसेच मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर येऊन याबाबत आश्वासन द्यायला हवे, अशी मागणीही मनोज जरांगेंनी केली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis