
अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने बडनेरा पोलिसांनी संवेदनशील भागात पायी गस्त घालत पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उरलगोडवार, विशेष क्राईम पोलीस निरीक्षक निलेश खरे यांच्यासह पोलीस पथकाने चांदणी चौक, शिवाजी चौक, जय हिंद चौक आणि आठवडी बाजार परिसरात प्रत्यक्ष फिरून परिस्थितीचा आढावा घेतला.
पायी गस्तीदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून परिसरातील संशयास्पद हालचाली, सुरक्षेच्या समस्या तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित बाबींची माहिती घेतली. त्यामुळे संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढल्याचे चित्र दिसून आले.दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये सराईत गुन्हेगार आणि तडीपार व्यक्तींचे पोस्टर व बॅनर लावण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तींची ओळख नागरिकांना सहज पटावी आणि तडीपार व्यक्ती शहरात आढळून आल्यास पोलिसांना तातडीने माहिती देता यावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.तडीपार व्यक्ती शहरात फिरताना आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता बडनेरा पोलीस किंवा क्राईम पोलीस निरीक्षक निलेश खरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तडीपारांचे पोस्टर विविध भागांत
शहरातील प्रमुख तसेच संवेदनशील परिसरात सराईत गुन्हेगार व तडीपार व्यक्तींचे पोस्टर लावण्यात आल्याने नागरिकांमध्येही जनजागृती होत आहे. पायी गस्त, प्रत्यक्ष पाहणी आणि पोस्टरच्या माध्यमातून पोलिसांनी प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर भर दिल्याचे दिसून येत आहे. वलगाव व बडनेरा पोलिसांनी दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून लोखंडी तलवारी जप्त केल्या आहेत. वलगावच्या बाजारपुरा परिसरात नागरिकांना तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा शेख नजीम ऊर्फ कालू शेख नबी (वय ३०, रा. सतीनगर, वलगाव) याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. शेख नजीमविरुद्ध आर्म ऍक्टनुसार गुन्हा नोंदविल्याची माहिती वलगावच्या पोलिस निरीक्षक रीता उईके यांनी दिली.
तर, बडनेऱ्यात भगतसिंग चौक, जुनी वस्ती परिसरातील प्रज्ज्वल संजय कैथवास (वय २३) याची पोलिसांनी झडती घेतली. त्याच्याकडूनही एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. बडनेरा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती बडनेऱ्याचे पोलिस निरीक्षक हनमंत उरलागोंडावार यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी