
रायगड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा रायगड जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात शुभारंभ करण्यात आला. अभियानांतर्गत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या चित्ररथाचे उद्घाटन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, माजी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद रायगडचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ रविशेठ पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे तसेच पंचायत समितीच्या आदिवासी गण सदस्य श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासात्मक उपक्रम, पात्रता निकष आणि योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया नागरिकांपर्यंत सहज व प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सेवा संकल्प चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचविणे, नागरिकांना योजनांबाबत मार्गदर्शन करणे तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित महिला मेळाव्यात ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व सबलीकरण अभियानाला’ विशेष चालना देण्यात आली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने दोन महिला बचत गट तसेच पाच वैयक्तिक लाभार्थ्यांना विविध उपक्रमांसाठी मान्यवरांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले.
शासकीय योजनांची माहिती, जनजागृती आणि प्रत्यक्ष लाभ यांचे प्रभावी एकत्रीकरण करून ‘सेवा संकल्प अभियान’ जनतेच्या दारी पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)