
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
वैजापूर तालुक्यात मातीचे गणपती बनवून खेळणाऱ्या १३ मुलांना एरंडीच्या बिया प्रसाद म्हणून खाल्ल्याने विषबाधेची लक्षणे दिसून आली. कापूसवाडगावातील चर्चमागील गल्लीत ही घटना घडली. त्यानंतर मुलांना पोटदुखी, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने त्यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला पाच, त्यानंतर आणखी आठ मुलांना रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले असून सर्व मुलांना २४ तास वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक रुग्णालयात दाखल झाले आणि उपचारांची माहिती घेतली. एरंडीच्या बियांमध्ये विषारी रायसीन घटक आढळतो. मुलांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis