साखरपुड्याला जमले अन् थेट लग्नच लागलं! कडवकरांच्या आवाहनाला कुटुंबांचा सकारात्मक प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। साखरपुड्याची तयारी झाली, नातेवाईक जमले, कार्यक्रम सुरू झाला... आणि त्याचवेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांचा फोन आला. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन साखरपुड्यानंतर स्वतंत्र विवाह सोहळ
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

साखरपुड्याची तयारी झाली, नातेवाईक जमले, कार्यक्रम सुरू झाला... आणि त्याचवेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांचा फोन आला. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन साखरपुड्यानंतर स्वतंत्र विवाह सोहळा मोठ्या खर्चात करण्याऐवजी याच कार्यक्रमात विवाह करण्याचे आवाहन कडवकर यांनी केले. त्यांच्या आवाहनाला दोन्ही कुटुंबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि काही वेळातच साखरपुड्याचा कार्यक्रम थेट विवाह सोहळ्यात बदलला.

वाशी तालुक्यातील शेंडी येथील संतोष महादेव भायगुडे आणि बाज तालुक्यातील भोंत्रे येथील प्रिया भाऊसाहेब लांडे यांचा विवाह ठरला होता. विवाह सोहळ्यासाठी होणारा मोठा खर्च टाळण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला होता. त्यानुसार साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मात्र, कार्यक्रम सुरू असतानाच निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी वधू-वरांना फोनवरून शुभेच्छा देताना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ दिला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र विवाह सोहळ्यासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळता येईल, असे सांगत त्यांनी याच कार्यक्रमात विवाह करण्याचे आवाहन केले.

कडवकर यांच्या आवाहनानंतर दोन्ही कुटुंबांनी आपसात चर्चा केली आणि विवाहाचा निर्णय घेतला. काही वेळातच साखरपुड्याचा कार्यक्रम विवाह सोहळ्यात बदलला. उपस्थित नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या साक्षीने संतोष आणि प्रिया विवाहबद्ध झाले.

या निर्णयाचे उपस्थित नातेवाईक, ग्रामस्थ तसेच मित्रपरिवाराने स्वागत केले. दुष्काळी परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी गरजू विद्यार्थी, शेतकरी किंवा संकटातील कुटुंबांच्या मदतीसाठी पैसा वापरता येऊ शकतो, असा सामाजिक संदेश या निर्णयातून देण्यात आला.

विवाहानंतर उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी नवदांपत्यासह दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन केले. दुष्काळाच्या काळात विवाह आणि इतर समारंभांमध्ये होणारा अवास्तव खर्च कमी करून सामाजिक गरजांसाठी त्याचा उपयोग करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भायगुडे–लांडे कुटुंबाचा हा निर्णय दुष्काळी परिस्थितीत सामाजिक भान जपणारा ठरला असून, अनावश्यक खर्चाला फाटा देत साधेपणाने विवाह करण्याचा संदेश या निमित्ताने पुढे आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande