
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भक्ती, संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जालना यांच्या वतीने ‘महागणेशोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत अग्रसेन भवन, जालना येथे हा भव्य उत्सव संपन्न होणार आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित होणार आहे. श्रद्धा आणि संस्कृतीसोबतच नागरिकांना एकत्र आणणारा लोकसहभागाचा उत्सव म्हणून हा महागणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्व नागरिकांसाठी खुला व विनामूल्य असून जालना शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन महागणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis