आयआयटी बॉम्बेत विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे अर्थात आयआयटी बॉम्बेच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बी.टेक.च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पस
IIT bombay btech student suicide using chatgpt in exam


मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे अर्थात आयआयटी बॉम्बेच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बी.टेक.च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करत संस्थेच्या प्रशासनाकडून पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करून त्याद्वारे उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले होते. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी चर्चा केली होती. मात्र, त्याच्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती. तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, असे त्याला समजावून सांगण्यात आल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विभागप्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या वसतिगृहातील खोलीत गेला. त्यानंतर सायंकाळी तो खोलीत मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या प्रशासनाने पोलिसांना कळविले. संबंधित अधिकारी विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील कारणांचा तपास करत आहेत.

विद्यार्थ्यांचा दावा आहे की, परीक्षेत कॉपी केल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थ्याला एका वर्षाच्या निलंबनाची धमकी देण्यात आली होती. एक वर्षाचे निलंबन झाल्यास हॉस्टेल रिकामे करून कॅम्पसबाहेर राहावे लागले असते, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. तसेच, निलंबनामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण चार वर्षांत पूर्ण होण्याऐवजी पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लागू शकला असता, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याच कारवाईच्या भीतीमुळे आणि मानसिक दबावामुळे साहिल वाकोडेने आत्महत्या केल्याचा आरोप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, या आरोपाची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कॅम्पसमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रेय नलावडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून आयआयटी प्रशासन त्यांच्याशी चर्चा करत आहे. या चर्चेतून समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन अन् परीक्षा पुढे ढकलल्या

या घटनेची माहिती पसरताच कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत आयआयटी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने सुरू केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आक्रोशामुळे सध्या सुरू असलेल्या मिड-सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. आयआयटी बॉम्बेने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृत विद्यार्थ्याचे मित्र, सहाध्यायी, प्राध्यापक आणि या घटनेमुळे प्रभावित झालेल्या इतरांना संस्थेकडून आवश्यक मदत दिली जात असल्याचे सांगितले आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande