
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
सर्व ६० महसूल मंडळांमध्ये पीक नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश
लातूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची बनावट यादी समाजमाध्यमांवर फिरत असून, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणाऱ्या या बनावट यादीचा शोध घेऊन ती तात्काळ समाजमाध्यमांवरून हटवावी, असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये जूनपासून पर्जन्यमानात मोठी अनियमितता आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात विविध कालावधीचे दीर्घ पावसाचे खंड पडले आहेत. तालुकानिहाय अहवालानुसार लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि जळकोट या सर्व तालुक्यांमध्ये पाण्याच्या अभावामुळे पिकांवर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिके करपण्याच्या तसेच पूर्णतः सुकण्याच्या अवस्थेत असून, उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वस्तुस्थिती लक्षात घेऊन पीक विमा कंपन्यांना तातडीने सर्वेक्षण मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळाला वगळता न ठेवता सर्व ६० महसूल मंडळांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे. सोयाबीनसह इतर बाधित पिकांचे नुकसान वस्तुनिष्ठपणे नोंदवून पात्र शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेत नुकसानभरपाई मिळावी, यासाठी विमा कंपन्यांनी कोणतीही दिरंगाई करू नये, असे निर्देश त्यांनी दिले.
ज्या महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमानातील खंड (Dry Spell) निकषानुसार स्पष्ट झाला आहे, तेथे तातडीने आगाऊ नुकसानभरपाईची (Mid-Season Adversity) प्रक्रिया सुरू करावी. जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने सर्वेक्षणाच्या कामावर बारकाईने देखरेख ठेवावी तसेच याबाबतचा प्रगती अहवाल शासनास नियमितपणे सादर करावा, असेही मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis