
अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंबागेट येथील निळकंठ व्यायाम मंडळ गणेशोत्सवात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात शेतकरी जयंत सगणे यांनी ‘जलयुक्त शिवार’ योजनेमुळे जमिनीतील जलस्तर वाढल्याचा तसेच ‘गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता वाढून शेतातील मातीची सुपीकता सुधारल्याचा अनुभव कथन केला.गौरव केवले यांनी छतावरील पावसाचे पाणी शोषखड्ड्यात मुरविण्याच्या केलेल्या प्रयोगाची माहिती दिली. त्यांच्या या प्रयोगातून पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याचे महत्त्व नागरिकांसमोर मांडण्यात आले.जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना ‘लोकसंवाद’ उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर मृद व जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी भूषण जावकर यांनी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली.
कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी आशिष येवले यांनी बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती दिली. दोन्ही विभागांच्या योजनांची माहिती जाणून घेतल्यानंतर नागरिकांनी आपली मतेही व्यक्त केली.या उपक्रमादरम्यान केवळ योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. तसेच पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी निळकंठ व्यायाम मंडळ गणेशोत्सवाचे अध्यक्ष अनंत साऊकर, सचिव ऐश्वर्य खेडकर, मार्गदर्शक दीपक उंडीकर, अभिनंदन पेंढारी, तसेच निळकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष दीपक गुल्हाने आणि पंकज लुंगीकर यांनीही उपक्रमात सहभाग घेत आपले विचार व्यक्त केले.-------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी