
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
थकबाकीदार शेतकऱ्यांप्रमाणेच नियमित आणि प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी खंडाळी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन व्यंकट बालासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली १७ सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून, लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देत आंदोलकांच्या मागणीला खंबीर समर्थन दर्शविले आणि प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
शासनाच्या कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जात असताना, वेळेवर कर्जफेड करणाऱ्या चालूबाकीदार शेतकऱ्यांना मात्र केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत असल्याचा मुद्दा आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे. हा दुजाभाव पूर्णपणे अन्यायकारक असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांचे सरसकट प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी आक्रमक मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी व्यंकट पाटील खंडाळीकर व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यापूर्वी १० ऑगस्ट आणि २७ ऑगस्ट २०२६ रोजी अहमदपूर तहसील कार्यालयामार्फत शासनाला निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून किंवा शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने, अखेर १७ सप्टेंबरपासून व्यंकट पाटील यांनी आमरण अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे.
उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी तातडीने माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आणि व्यंकट पाटील यांचा त्यांच्याशी संवाद घडवून आणला. त्यानंतर त्यांनी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बाष्टेवाड आणि उपजिल्हाधिकारी मंजूषा लटपटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आंदोलनाला तीन दिवस होत आले तरी प्रशासनातील एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नसल्याची गंभीर बाब त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा सज्जड इशारा यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी दिला.
दरम्यान, खंडाळी व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. यावेळी शिवसेना तालुका संघटक तथा एस.टी. कामगार सेना प्रमुख मार्गदर्शक अनिकेत फुलारी, ऋषिकेश खोमणे, पत्रकार बालाजी काळे, प्रदीप शिंगडे, व्यंकट सुरकुटे, लहू बारवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते. या आंदोलनाचे निवेदन मुख्यमंत्री, सहकार मंत्री तसेच स्थानिक प्रशासनाला पाठविण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर जोपर्यंत शासनाकडून ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंतमागे हटणार नाही आणि आंदोलन सुरूच राहील, असा दृढ निर्धार व्यंकट पाटील खंडाळीकर यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या प्रोत्साहनपर अनुदानाच्या मागणीमुळे सध्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून, यावर शासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis