वेदना पायात, पण जिद्द आंदोलनाच्या मैदानात! उद्धव ठाकरेंनी विचारपूस केल्याने बालाजी रेड्डी भारावले
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। ‘शिवसेना हा पक्ष नाही, कुटुंब आहे’ अशी भावनिक प्रतिक्रिया पायावर शस्त्रक्रिया झालेली... शरीराला विश्रांतीची गरज... मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचे मैदान सोडायचे नाही, या जिद्दीने लातूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रम
बालाजी रेड्डी


लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

‘शिवसेना हा पक्ष नाही, कुटुंब आहे’ अशी भावनिक प्रतिक्रिया

पायावर शस्त्रक्रिया झालेली... शरीराला विश्रांतीची गरज... मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचे मैदान सोडायचे नाही, या जिद्दीने लातूर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी आंदोलनात सक्रिय राहिले. या कार्याची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः रेड्डी यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. पक्षप्रमुखांच्या या ममत्वपूर्ण शब्दांनी आंदोलनाच्या धावपळीत असलेल्या रेड्डी यांच्या मनाला मोठा आधार मिळाला.

‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी बालाजी रेड्डी यांच्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती घेतली. शस्त्रक्रियेनंतरही आंदोलनात सक्रिय असल्याचे समजल्यानंतर त्यांनी रेड्डी यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची सूचना केली. नेत्याने कार्यकर्त्याची घेतलेली ही साधीशी विचारपूस रेड्डी यांच्यासाठी मात्र भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला.

‘वेदना माझ्या पायात आहेत; पण पक्षासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची जिद्द मनात आहे,’ या भावनेने रेड्डी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या या तळमळीची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दानवेंकडूनही रेड्डींच्या कार्याची दखल

दरम्यान, विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादासजी दानवे यांनी आपल्या भाषणात बालाजी रेड्डी यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. पायावर शस्त्रक्रिया झालेली असतानाही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार रेड्डी लातूर जिल्ह्यात आंदोलन उभे करत असल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेच्या प्रश्नांसाठी मराठवाड्यातील प्रत्येक भागात कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीने आंदोलने उभी करण्याची गरज असल्याचे दानवे यांनी सांगितले.

‘एका विचारपुशीने मिळाली नवी ऊर्जा’

उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर बालाजी रेड्डी यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर आमच्यासाठी एक कुटुंब आहे. पक्षप्रमुखांनी स्वतः माझ्या तब्येतीची विचारपूस केली, माझी काळजी घेतली, हे माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. त्यांच्या एका विचारपुशीने मला मोठी ऊर्जा आणि नवी प्रेरणा मिळाली. उद्धवजी ठाकरे साहेबांचे हे ममत्व शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही,’ अशी भावना रेड्डी यांनी व्यक्त केली.

आपल्या नावाचा उल्लेख करून आंदोलनातील कार्याची दखल घेतल्याबद्दल अंबादासजी दानवे यांचेही रेड्डी यांनी आभार मानले. तसेच ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचेही त्यांनी आभार मानले.

शरीराला विश्रांतीची गरज, पण मन मात्र लढण्यासाठी सज्ज!

शस्त्रक्रियेनंतरही आंदोलनाच्या मैदानात उतरलेले बालाजी रेड्डी यांचे कार्य पक्षातील कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे उदाहरण म्हणून चर्चेत आले आहे. शरीराला विश्रांतीची गरज असली, तरी जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची जिद्द कायम आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पक्षप्रमुखांचे मार्गदर्शन, वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आणि शिवसैनिकांचे पाठबळ हीच आपली ताकद असल्याचे सांगत रेड्डी यांनी पुढील काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

एका कार्यकर्त्याच्या वेदनेची जाणीव पक्षप्रमुखांनी ठेवली आणि एका विचारपुशीने कार्यकर्त्याला नवी ऊर्जा दिली—याच भावनेने ‘शिवसेना म्हणजे कुटुंबच’ हा अनुभव बालाजी रेड्डी यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande