
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
कन्नड तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील विविध समस्या व प्रलंबित विकासकामांबाबत आमदार संजना ताई जाधव यांच्या समवेत जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत जैतापूर, वैसपूर, कादरपूर, आलापूर, अंतापूर व कैसापूर येथील ग्रामस्थांनी रस्ते, पाणीपुरवठा, जलसंपदा विभागाची प्रलंबित कामे, गावांचे सीमांकन, शेतरस्ते व पुलांची सुविधा, स्मशानभूमी, महावितरणचे खांब स्थलांतर, घरांच्या वाढीव मोबदल्यासह विविध नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न मांडले.
ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची दखल घेत गौडा यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. प्रलंबित कामांचा विभागनिहाय आढावा घेऊन कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis