
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। बंदीजनांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य आणि कौशल्य विकासासाठी कारागृह प्रशासनाने विविध उपक्रम राबवावेत. शिक्षा पूर्ण केल्यानंतर ते कुशल, आत्मविश्वासपूर्ण आणि सकारात्मक व्यक्ती म्हणून समाजात पुन्हा परतले पाहिजेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी केले.
धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या पुढाकारातून मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांच्या आरोग्य सेवेसाठी विविध वैद्यकीय उपकरणे व सहसाहित्याचे दान करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘लोकसंवाद’ या सहयोगी उपक्रमांतर्गत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रमही राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत हृदयरोग, कर्करोग, कान-नाक-घसा, डोळे, त्वचारोग, रक्तदाब, मधुमेह, हाडांची तपासणी यासह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. महिलांसाठी पॅप स्मीअर तपासणी, मोतीबिंदू तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले.बंदीजनांनी केलेल्या चुका सुधारण्याची संधी असून, वर्तमानातील प्रयत्नांतून आपले भविष्य घडवावे, असा संदेशही न्या. सूर्यवंशी यांनी दिला.या उपक्रमाला विविध रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि धर्मादाय संस्थांनी सहकार्य केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis