पुणे-ऊसगाळप हंगामासाठी १२७ कारखाने सज्ज; परवाना प्रक्रियेला वेग
पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.)राज्यातील यंदाचा ऊसगाळप हंगाम मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार साखर आयुक्तालयाच्या ‘ऑनलाइन क्रशिंग लायसन्स’ प्रणालीवर गाळप परवान्यासाठी आतापर्यंत १२७ साखर कारखान्यांनी अर्ज क
sugar


पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.)राज्यातील यंदाचा ऊसगाळप हंगाम मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार साखर आयुक्तालयाच्या ‘ऑनलाइन क्रशिंग लायसन्स’ प्रणालीवर गाळप परवान्यासाठी आतापर्यंत १२७ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये ६६ सहकारी आणि ६१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.यंदाच्या हंगामात उसाची उपलब्धता तुलनेने कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गाळप परवाना मिळाल्यानंतर घोषित तारखेनुसार पहिल्या टप्प्यात मोठ्या दैनंदिन गाळप क्षमतेच्या कारखान्यांकडून कार्यक्षेत्राबाहेरील ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा साखर उद्योगातील वर्तुळात सुरू आहे.गाळप परवाना मिळविण्यासाठी कारखान्यांना साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ऑनलाइन क्रशिंग लायसन्स प्रणालीवर प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे.

हंगाम २०२६-२७ साठी आतापर्यंत १२७ कारखान्यांनी ऑनलाइन प्रस्ताव भरण्यास सुरुवात केली आहे.प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयनिहाय पाहता अहिल्यानगर विभागातील २२, अमरावती १, छत्रपती संभाजीनगर १६, कोल्हापूर २४, नागपूर १, नांदेड १८, पुणे २१ आणि सोलापूर विभागातील २४ कारखान्यांनी ऑनलाइन प्रस्ताव दाखल केले आहेत. उर्वरित प्रस्ताव संबंधित प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात प्रत्यक्ष दाखल झाल्याचे सांगण्यात आले.साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयाकडून ऊसगाळप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यासही प्राधान्य दिले जाणार आहे.परिपूर्ण प्रस्तावांना साखर आयुक्तांची मान्यता घेतल्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच गाळप परवाना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्यांना घोषित तारखेनुसार वेळेत गाळप हंगाम सुरू करता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande