मतदार यादी पुनरीक्षणासाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात विशेष शिबिरांचे आयोजन
सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर 249-सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांव
voter  matdar


सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर 249-सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर 19, 20, 26 आणि 27 सप्टेंबर 2026 रोजी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला आणि दिव्यांग नागरिकांची मतदार यादीत शंभर टक्के नोंदणी व्हावी, तसेच विद्यमान मतदारांच्या नोंदी अद्ययावत व्हाव्यात, यासाठी ही शिबिरे घेण्यात येत आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.विशेष शिबिरे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व मतदान केंद्रांवर होणार आहेत. या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आपापल्या केंद्रांवर उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार नोंदणी, नोंदीतील दुरुस्ती तसेच नाव वगळण्याबाबतचे अर्ज स्वीकारणार आहेत.नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. 6, मतदार यादीतील चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी तसेच मयत किंवा स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना क्र. 7, तर नाव, वय, लिंग, नातेसंबंध, पत्ता आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्र. 8 मध्ये अर्ज करता येणार आहे

.दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. नागरिकांना शिबिराच्या ठिकाणी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शनही मिळणार आहे.या विशेष शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनीही उपस्थित राहावे, अशा सूचना संबंधित राजकीय पक्षांना देण्यात येणार आहेत. महिला आणि दिव्यांग नागरिकांच्या समावेशनाला शिबिरांमध्ये विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.मतदार यादीतील आपली नोंद तपासून आवश्यक असल्यास नवीन नोंदणी, दुरुस्ती किंवा नाव वगळण्यासाठी नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा. पात्र नागरिक मतदार यादीत नाव नोंदविण्यापासून वंचित राहू नयेत आणि विद्यमान मतदारांच्या नोंदी अद्ययावत राहाव्यात, यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande