
हिंगोली, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील आपले नाव नागरिकांनी तपासावे. आवश्यक असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. तसेच ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी (नमुना ६ व आवश्यक कागदपत्रांसह) मतदार यादीत नाव नोंदवावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यात एकूण आठ लाख ८४ हजार ७६ मतदार आहेत. यात चार लाख ६१ हजार २११ पुरुष, चार लाख २२ हजार ८५३ महिला आणि १२ इतर मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा मतदारसंघ निहाय वसमत येथे दोन लाख ९० हजार २२१, कळमनुरी येथे दोन लाख ९८ हजार ८५४, तर हिंगोली येथे दोन लाख ९५ हजार एक मतदार आहेत. विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान विविध कारणांमुळे ८५ हजार ३१६ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यात आढळून न आलेले ११ हजार ८२२, कायमस्वरूपी स्थलांतरित ४१ हजार ८७६, मृत २१ हजार ५१७, अन्यत्र नोंदणी किंवा दुबार नोंद असलेले नऊ हजार ९२६ आणि इतर १७५ मतदारांचा समावेश आहे.
वसमत मतदारसंघात आढळून न आलेले तीन हजार २०० गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित १३ हजार ५०९, मृत आठ हजार १५१, दुबार नोंद असलेले दोन हजार ८५७ आणि इतर ४२ असे एकूण २७ हजार ७५९ मतदार आहेत. कळमनुरी मतदारसंघात आढळून न आलेले दोन हजार ३८७ गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित १३ हजार ६१५, मृत सहा हजार १९७, अन्यत्र नोंदणी केलेले तीन हजार ४५३ आणि इतर ७२ असे एकूण २५ हजार ७२४ मतदार आहेत. हिंगोली मतदारसंघात आढळून न आलेले सहा हजार २३५, कायमस्वरूपी स्थलांतरित १४ हजार ७५२, मृत सात हजार १६९, अन्यत्र नोंद असलेले तीन हजार ६१६ आणि इतर ६१ असे एकूण ३१ हजार ८३३ मतदार आहेत.
प्रारूप मतदार यादी तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच hingoli.nic.in या हिंगोली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकतींचा निपटारा २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येईल. त्यानंतर ०४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुन्यात ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. संबंधित अर्ज voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मतदारांना संबंधित बीएलओशी थेट संपर्क साधण्यासाठी ECINET 3 ॲपवरील ‘Book a Call with BLO’ सुविधेचाही वापर करता येणार आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis