पाणी प्यायले, सलाईन घेतले; मात्र उपोषण सोडण्यास जरांगेंचा नकार
छत्रपती संभाजीनगर, २ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सलग पाचव्या दिवशीही सुरू आहे. बुधवारी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उपोषणस्थळी भेट देत जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी लाड यांच्या हस्ते जरांग
अ


छत्रपती संभाजीनगर, २ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सलग पाचव्या दिवशीही सुरू आहे. बुधवारी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उपोषणस्थळी भेट देत जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी लाड यांच्या हस्ते जरांगे यांनी पाणी घेतले. सरकारने त्यांच्या विविध मागण्या मान्य केल्याचा दावा प्रसाद लाड यांनी यावेळी केला. मात्र, मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली.

जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी किमान चार प्रमाणपत्रे देण्याची अट ठेवली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांचे वाटप सुरू होऊ द्या, त्यानंतर उपोषणाबाबत विचार करू, असे त्यांनी सांगितले. तसेच हैदराबाद गॅझेटअंतर्गत प्रमाणपत्रांचे वाटप मराठवाड्यातूनच सुरू करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

तुमच्या शब्दाचा मान राखतो; मात्र उपोषण सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्यासमोर मांडली. पाणी घेत असलो आणि सलाईन लावत असलो तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन सलाईन घेईन, पाणी घेईन; पण उपोषण सोडणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सातारा आणि कोल्हापूर गॅझेटच्या मागणीबाबत जरांगे यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत सरकारकडून काय निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर जरांगे आपली भूमिका बदलतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande