
पारदर्शक प्रशासन व मंदिर संवर्धनावर सविस्तर चर्चा
अमरावती, २ सप्टेंबर (हिं.स.) : मंदिर संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन, देवस्थान इनाम जमिनींचे रक्षण, पारदर्शक प्रशासन तसेच मंदिर विश्वस्तांचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र देवस्थान समिती, अमरावती जिल्ह्याच्या वतीने मोर्शी तालुका मंदिर विश्वस्त बैठक उत्साहात पार पडली.ही बैठक श्री महालक्ष्मी धाम, पाळा-सालबर्डी रोड येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मोर्शी तालुक्यातील ६० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, अध्यक्ष, पदाधिकारी, पुजारी तसेच धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी देवस्थान इनाम जमिनी, महसूल नोंदी, मंदिर प्रशासनातील अडचणी, कायदेशीर बाबी तसेच मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिरांशी संबंधित विविध प्रश्नांवर तालुका व जिल्हास्तरावर एकत्रितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र देवस्थान समितीचे निलेश टवलारे, विजय करडे, धनराज वेलनकर, प्रकाश घोरमाडे, श्रीकृष्ण माहोरे व कैलास गिरोळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी विश्वस्तांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मोर्शी तालुक्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैठकीचे सूत्रसंचालन मुकेश पवार यांनी केले, तर श्री गिरीधर चव्हाण यांनी आभार मानले.
दरम्यान, भविष्यात मंदिर संरक्षण, संवर्धन आणि सशक्त संघटनासाठी अशा बैठका सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी