पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दत्तात्रय सावंत यांची नवी भूमिका
अपक्ष म्हणून निवडणूक न लढण्याचा निर्णय भाजप आणि महाविकास आघाडीचे दरवाजे खुले सोलापूर, २० सप्टेंबर (हिं.स.) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दत्तात्रय सावंत यांची नवी भूमिका


अपक्ष म्हणून निवडणूक न लढण्याचा निर्णय

भाजप आणि महाविकास आघाडीचे दरवाजे खुले

सोलापूर, २० सप्टेंबर (हिं.स.) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आगामी निवडणूक अपक्ष म्हणून लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

पंढरपूर येथे प्रमुख शिक्षक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सावंत यांनी आपल्या आगामी राजकीय भूमिकेबाबत माहिती दिली. “माझ्यासाठी भाजपबरोबरच महाविकास आघाडीचेही दरवाजे खुले आहेत. लवकरच निर्णय जाहीर करेन,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

दत्तात्रय सावंत यांनी यापूर्वी दोन वेळा अपक्ष म्हणून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली आहे. त्यापैकी एका निवडणुकीत त्यांना विजय मिळाला होता, तर मागील निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २०२०च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर विजयी झाले होते. सावंत हे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

आगामी निवडणुकीत अपक्ष म्हणून न लढण्याची भूमिका सावंत यांनी स्पष्ट केल्याने ते कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजप तसेच महाविकास आघाडी या दोन्ही पर्यायांचे दरवाजे खुले असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्या पुढील निर्णयाकडे शिक्षक मतदारसंघातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या २०२६च्या निवडणुकीसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यात आल्या असून अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदारसंघात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande