
जिल्ह्यातील ६९ महसूल मंडळांत पीकपाण्याची स्थिती बिकट
तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
अमरावती, २० सप्टेंबर (हिं.स.) : पावसाने सातत्याने दिलेला खंड आणि पिकांची बिघडत चाललेली स्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांना ऑगस्ट महिन्यात दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आला असला, तरी सप्टेंबरमध्ये परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९२ पैकी ६९ महसूल मंडळांमध्ये पीकपाण्याची स्थिती बिकट असल्याचे चित्र आहे.
यंदा मॉन्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने पेरण्यांनाही उशीर झाला. जुलैचा अपवाद वगळता जून आणि ऑगस्टमध्ये अपेक्षित सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक वातावरण निर्माण झालेले नाही. ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट कायम राहिल्यानंतर सप्टेंबर महिनाही कोरडा जाऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १८ दिवसांत ९७.२ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ६१.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि अंजनगाव सुर्जी या तीन तालुक्यांत आहे. या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील उर्वरित ११ तालुक्यांमध्ये हे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
सप्टेंबरमध्ये पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली असून दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्याचा दुसरा टप्पा सुरू करून तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
सुधारित वैज्ञानिक निकषांनुसार दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करताना पर्जन्यमानातील तूट, पावसाचा खंड, पिकांची प्रत्यक्ष स्थिती, जमिनीतील ओलावा, भूजल पातळी आणि पेरणीक्षेत्र यांसह विविध प्रभावदर्शक निर्देशांकांचा आधार घेतला जाणार आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी