भारत-जपानच्या हवाई दल प्रमुखांनी उडवले तेजस
राजनाथ सिंह म्हणाले, भारत-जपान संरक्षण भागीदारीसाठी ‘महत्त्वाचा टप्पा’ नवी दिल्ली, २० सप्टेंबर (हि.स.) : जोधपूर येथे सुरू असलेल्या भारत-जपान संयुक्त हवाई सराव ‘वीर गार्डियन’दरम्यान रविवारी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह आ
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह उड्डाणासाठी जाताना


राजनाथ सिंह म्हणाले, भारत-जपान संरक्षण भागीदारीसाठी ‘महत्त्वाचा टप्पा’

नवी दिल्ली, २० सप्टेंबर (हि.स.) : जोधपूर येथे सुरू असलेल्या भारत-जपान संयुक्त हवाई सराव ‘वीर गार्डियन’दरम्यान रविवारी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह आणि जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्सचे (जेएएसडीएफ) चीफ ऑफ स्टाफ जनरल ताकेहिरो मोरिता यांनी तेजस लढाऊ विमानातून स्वतंत्रपणे उड्डाण केले. यावेळी सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानांनीही आकाशात गर्जना केली.

भारत आणि जपानच्या हवाई दलांमधील वाढते संरक्षण सहकार्य, कार्यात्मक समन्वय आणि धोरणात्मक भागीदारीचे दर्शन या उड्डाणातून घडले. दोन्ही देशांच्या हवाई शक्तीच्या समन्वयाचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे.एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह आणि जनरल ताकेहिरो मोरिता यांनी जोधपूर एअर फोर्स स्टेशनवर ‘वीर गार्डियन’ सरावादरम्यान एलसीए तेजस मार्क-१ मधून स्वतंत्र उड्डाण केले. उड्डाणापूर्वी दोन्ही हवाई दल प्रमुख आपापल्या विमानांकडे रवाना झाले.

भारत आणि जपान यांच्यातील हा द्विपक्षीय हवाई सराव 9 सप्टेंबरपासून सुरू असून तो 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या सरावात दोन्ही देशांची आघाडीची लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. भारताकडून तेजस, सुखोई-30 एमकेआय आणि राफेल, तर जपानकडून एफ-2ए लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील कार्यक्षमता आणि परस्पर समन्वय वाढवणे तसेच संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 सप्टेंबर रोजी ‘वीर गार्डियन’ सरावासाठी जपानने आपली लढाऊ विमाने भारतात पाठवल्याच्या निर्णयाचे भारत-जपान संरक्षण भागीदारीतील ‘महत्त्वाचा टप्पा’ म्हणून वर्णन केले होते. जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या लढाऊ विमानांचा भारतातील हा पहिलाच दौरा असून, यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्यासाठी दोन्ही देशांमधील वाढता विश्वास आणि समान बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली येथे गेल्या महिन्यात जपानच्या संरक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत राजनाथ सिंह यांनी ‘वीर गार्डियन’सारख्या संयुक्त सराव आणि दोन्ही देशांमधील लष्करी देवाणघेवाणीमुळे परस्पर समन्वय आणखी दृढ होईल, असे नमूद केले होते.

भारतीय हवाई दलाने ‘वीर गार्डियन’ या द्विपक्षीय लढाऊ हवाई सरावासाठी जोधपूर येथे दाखल झालेल्या जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या एफ-२ लढाऊ विमानांचे स्वागत केले. चौदा दिवसांच्या या सरावादरम्यान दोन्ही देशांचे हवाई दल अत्याधुनिक कार्यात्मक मोहिमांमध्ये सहभागी होणार असून, व्यावसायिक अनुभवांची आणि कार्यपद्धतींची देवाणघेवाणही केली जाणार आहे.

जपानच्या लढाऊ विमानांसोबत भारताचा हा दुसरा द्विपक्षीय हवाई सराव आहे. यापूर्वी 2023 मध्ये भारतीय लढाऊ विमानांनी प्रथमच जपानला भेट दिली होती. त्या वेळी भारतीय तुकडीने चार सुखोई-30 एमकेआय विमानांसह सरावात सहभाग घेतला होता. ‘वीर गार्डियन’च्या पहिल्या आवृत्तीदरम्यान भारत आणि जपानच्या हवाई दलांनी 16 दिवसांच्या संयुक्त सरावातून एकमेकांच्या हवाई युद्धक्षमता आणि कार्यपद्धतींचा अनुभव घेतला होता.----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande