राज्यातील चार लाख शेत-पाणंद रस्त्यांचे होणार डिजिटल मॅपिंग
‘शेत सेतू : महापाणंद गतिशक्ती’ अभियानाला सुरुवात सुमारे ५० हजार रस्त्यांवर प्राधान्याने काम पुणे, २० सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही, सुरक्षित आणि सुलभ दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्
राज्यातील चार लाख शेत-पाणंद रस्त्यांचे होणार डिजिटल मॅपिंग


‘शेत सेतू : महापाणंद गतिशक्ती’ अभियानाला सुरुवात

सुमारे ५० हजार रस्त्यांवर प्राधान्याने काम

पुणे, २० सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीपर्यंत बारमाही, सुरक्षित आणि सुलभ दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना – शेत सेतू : महापाणंद गतिशक्ती’ अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे चार लाख शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रीड’ उभारण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमधून किमान दोन शेत किंवा पाणंद रस्त्यांची निवड केली जाणार आहे. राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमधील अंदाजे ५० हजार रस्त्यांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल नेटवर्क ‘इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’ (IWMS) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. उपग्रह प्रतिमा आणि डिजिटल नकाशांच्या माध्यमातून संबंधित रस्त्यांचे भौगोलिक स्थान तसेच त्यांची सद्यःस्थिती सार्वजनिक पोर्टलवर पाहता येणार आहे.

या डिजिटल प्रणालीमुळे शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यापासून अंदाजपत्रक, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, कार्यादेश, ई-मोजमाप पुस्तिका आणि ई-बिलिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने हाताळली जाणार आहे.

डिजिटल मॅपिंगमुळे राज्यातील शेत-पाणंद रस्त्यांची माहिती एकाच प्रणालीवर उपलब्ध होणार आहे. तसेच रस्त्यांची सद्यःस्थिती आणि सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

त्यामुळे या कामांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या शेतजमिनीपर्यंत वर्षभर सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतमालाची वाहतूक, कृषी निविष्ठांची ने-आण आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या अभियानाकडे पाहिले जात आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande