
पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील विविध सामाजिक घटकांतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘सारथी’, ‘बार्टी’, ‘महाज्योती’, ‘आर्टी’ आणि ‘टीआरटीआय’ या स्वायत्त संस्थांची पीएच.डी. अधिछात्रवृत्तीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील टप्प्यांना सुरुवात झाली आहे. मात्र खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) कार्यरत असलेल्या ‘अमृत’ संस्थेकडून अद्याप पीएच.डी. अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यातील विविध सामाजिक घटकांतील संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी अधिछात्रवृत्ती उपलब्ध करून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) आणि महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून केले जाते.
यापैकी बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आणि टीआरटीआय या संस्थांच्या अधिछात्रवृत्तीची अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘अमृत’कडून अद्याप अधिछात्रवृत्तीची जाहिरातच प्रसिद्ध झालेली नाही.सरकारकडून सर्व सामाजिक घटकांना समान न्याय देण्याची भूमिका मांडली जात असताना, ‘अमृत’च्या अधिछात्रवृत्ती प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधींबाबत अनिश्चिततेला सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.इतर संस्थांच्या अधिछात्रवृत्ती प्रक्रियेला वेग आला असताना ‘अमृत’ची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार, याकडे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु