
सोलापूर, 20 सप्टेंबर (हिं.स.)। जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रिटेवाडीच्या प्रांगणात उभारण्यात येत असलेली अर्धनिर्मित पाण्याची टाकी सध्या लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शाळा सुरू असताना तसेच सुट्टीच्या वेळी विद्यार्थी शाळेच्या आवारात खेळत असतात. त्यामुळे परिसरात विद्यार्थ्यांचा सतत वावर असतो. मात्र, शाळेच्या प्रांगणातच सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.अर्धनिर्मित टाकीभोवती कोणतेही प्रभावी सुरक्षा कुंपण, अडथळे किंवा इतर प्रतिबंधात्मक उपाय नसल्यामुळे लहान मुले अनवधानाने बांधकामाच्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.संबंधित ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. शाळेच्या आवारात बांधकाम सुरू असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड