क्रीडा विभागाच्या योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा : जगन्नाथ लकडे
पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थी, युवक आणि खेळाडूंसाठी क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेऊन राज्यात अनेक गुणवंत क्रीडापटू घडविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.‘लोकसंवाद-२०२६’ उप
क्रीडा विभागाच्या योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा : जगन्नाथ लकडे


पुणे, 20 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थी, युवक आणि खेळाडूंसाठी क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेऊन राज्यात अनेक गुणवंत क्रीडापटू घडविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत विश्वज्योत मित्र गणपती मंडळ, नारायण पेठ आणि विजयी मारुती मंडळ ट्रस्ट, शनिवार पेठ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी क्रीडांगण विकास, व्यायामशाळा विकास, युवा पुरस्कार, युवा महोत्सव तसेच गुणवंत खेळाडूंसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रोत्साहनपर योजनांची माहिती दिली.क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी क्रीडांगण विकास योजना आणि व्यायामशाळा विकास योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून युवकांना नियमित व्यायाम तसेच क्रीडा सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे युवकांनी उपलब्ध सुविधांचा नियमित वापर करून क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी, असे लकडे यांनी सांगितले.विद्यार्थी आणि युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

विविध कला प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना प्रमाणपत्रांसह रोख पारितोषिके देऊन प्रोत्साहन दिले जाते. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा युवा पुरस्काराने गौरव करण्यात येतो.राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गुणवंत खेळाडूंना अतिरिक्त गुणांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत पाच टक्के आरक्षणाची तरतूद असल्याची माहिती लकडे यांनी दिली.

याशिवाय एशियन, कॉमनवेल्थ आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या धोरणानुसार थेट नियुक्तीची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.‘मिशन लक्षवेध’ योजनेंतर्गत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकविजेत्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये निवास, भोजन, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, फिजिओथेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ तसेच क्रीडा विज्ञानाशी संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे.यावेळी विश्वज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष विपुल इनामदार तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande