एडीसीसी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू
एकूण २ ८२५ मतदारांचा समावेश; ३० सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना मागविल्या अमरावती, २२ सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) आगामी निवडणुकीसाठी २ हजार ८२५ मतदारांचा समावेश असलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी, २२ सप्टेंबर र
जिल्हा बँकेच्या मतदार यादीत 2825 मतदार ३० सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचनाची मुदत


एकूण २ ८२५ मतदारांचा समावेश; ३० सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना मागविल्या

अमरावती, २२ सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) आगामी निवडणुकीसाठी २ हजार ८२५ मतदारांचा समावेश असलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. या यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेतल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एडीसीसी बँकेच्या २० सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ येत्या ४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने आगामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक नियोजित वेळेत होण्याची शक्यता नसली तरी प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे सरकली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून बँकेच्या सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधारी बच्चू कडू-अभिनीत ढेपे गट आणि विरोधी काँग्रेस गट यांच्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक आणि मतदानाची तारीख जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुकानिहाय मतदारसंख्येत अमरावती तालुका आघाडीवर असून येथे ७०७ मतदार आहेत. त्याखालोखाल चांदूर बाजारमध्ये ३७८, अचलपूरमध्ये ३२९, दर्यापूरमध्ये २८२, वरुडमध्ये २२६, मोर्शीमध्ये २२५, अंजनगाव सुर्जीमध्ये १८७, नांदगाव खंडेश्वरमध्ये १७१, तिवसा येथे ८२, धामणगाव रेल्वे येथे ७२, भातकुलीमध्ये ६४, चांदूर रेल्वे येथे ५०, धारणीमध्ये २८, तर चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी २४ मतदार आहेत.

अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे पुढील टप्पे स्पष्ट होणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande